सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि साहित्याची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल तसेच श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कवी आपल्या भेटीला” या अभिनव उपक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी आपल्या ‘बकुळीची फुले’ या नव्या काव्यसंग्रहातील विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था तसेच श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आ. भि. राऊळ होते. व्यासपीठावर संस्था सचिव पांडुरंग दळवी, प्राचार्य आर. के. राठोड, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष राजेश गुडेकर आणि प्रमुख अतिथी कवी दीपक पटेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून देत विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, लेखन आणि वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते कवी दीपक पटेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना कवी दीपक पटेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगितली. गद्य स्वरूपातील विचार पद्यात कसे मांडता येतात, याचे प्रात्यक्षिक देत त्यांनी शब्दसंपदेचे महत्त्व अधोरेखित केले. “चांगला लेखक किंवा कवी होण्यासाठी अवांतर वाचन अत्यावश्यक आहे. इतर लेखक-कवींचे साहित्य वाचा. वाचनामुळे केवळ साहित्यिक दृष्टीच समृद्ध होत नाही, तर स्पर्धा परीक्षांमध्येही त्याचा मोठा फायदा होतो,” असे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “वाचाल तर वाचाल” या संदेशाचे स्मरण करून दिले.
यानंतर त्यांनी ‘बकुळीची फुले’ या वृत्तबद्ध काव्यसंग्रहातील निसर्ग, जीवनमूल्ये आणि मालवणी भाषेतील निवडक कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच हा उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षण संस्था, ग्रंथालय आणि शिक्षकांचे कौतुक करत हायस्कूल व ग्रंथालयाला ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहाच्या प्रती भेट दिल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही निसर्ग, श्रावण, जंतर-मंतर तसेच हिंदी कविता सादर करून साहित्यिक वातावरण अधिक खुलविले. यामध्ये जान्हवी राऊळ, निमिष राऊळ, रोहन गावडे, रिया होडावडेकर, आर्यन कानसे, साईशा बांदेकर आणि फराहन कर्णेकर यांनी सहभाग घेतला.
यावेळी महेंद्र सारंग, नेत्रा चव्हाण, नितीन धामापूरकर, चंद्रकांत वंगाळ, नूतन कडावलकर, क्रांती मयेकर, सुषमा कासार, नेहा कोंडये, म्हाडळकर, ग्रंथपाल आरती कोरगावकर, प्रथमेश करंगुटकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले, तर लवू जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.



