बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात देवनागरी सुलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आणि श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. सुनील नांदोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसीय देवनागरी सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुंदर हस्ताक्षर व सुलेखन कलेचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

https://youtu.be/a2r10e9tKUc


चार दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. धनश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. सुनील नांदोसकर, डॉ. मनीषा मुजुमदार यांच्यासह सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. सुनील नांदोसकर यांनी सुलेखन ही आत्मसात करण्यासारखी सुंदर आणि सर्जनशील कला असल्याचे सांगितले. हस्ताक्षर आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफी या दोन स्वतंत्र संकल्पना असून, सुलेखनामध्ये अक्षरांचे सौंदर्य, प्रमाणबद्धता, रचना, वळण आणि मांडणी यांना विशेष महत्त्व असते, असे त्यांनी स्पष्ट केले. चार दिवसांच्या कालावधीत सुलेखनाची मूलभूत तत्त्वे समजून घेत प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून ही कला कशी आत्मसात करता येईल, याबाबत त्यांनी सहभागींचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान सुलेखनासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे स्ट्रोक कशा पद्धतीने द्यावेत, अक्षरांची ठेवण आणि रचना कशी असावी, देवनागरीतील अक्षरलेखन कोणत्या पद्धतीने करावे, अक्षरांमध्ये योग्य प्रमाणबद्धता कशी राखावी तसेच अक्षरलेखनामध्ये सौंदर्य आणि कलात्मकता कशी साधावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता सहभागी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. प्रत्येक अक्षरातील बारकावे समजावून सांगत सहभागींच्या लेखनातील त्रुटी दूर करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रा. सुनील नांदोसकर यांनी देवनागरी तसेच इंग्रजी सुलेखनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. वळणदार, प्रमाणबद्ध, स्वच्छ आणि सुबक अक्षरलेखन कशा पद्धतीने केले जाते, याचे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. अक्षरांच्या रचनेपासून ते शब्दांची मांडणी, लेखनातील समतोल आणि सौंदर्य याबाबत त्यांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली. सहभागी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रकारच्या अक्षरलेखनाचा सराव करून या कलेचा आनंद घेतला.
यावेळी डॉ. मनीषा मुजुमदार यांनी सुलेखन कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लेखनासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखनाच्या कलेचे महत्त्व काहीसे मागे पडत चालले आहे. सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन हा केवळ अक्षरांचा आकार नसून व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. सुलेखन हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असून, या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सौंदर्यदृष्टी, एकाग्रता आणि सर्जनशीलतेचा अनुभव मिळतो. त्यामुळे आजच्या पिढीला या कलेचे महत्त्व समजावे आणि लोप पावत चाललेल्या या कलेला नव्याने प्रोत्साहन मिळावे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी तन्मय शितोळे, सारा प्रभू, प्रा. सुरेखा धुरी, प्रीती वाडकर, केतकी वेंगुर्लेकर, उल्हास सामंत आणि स्वराज्य गायकवाड यांनी कार्यशाळेतील आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. कार्यशाळेमुळे सुलेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, अक्षरलेखनातील बारकावे, त्यामागील शास्त्र आणि कलात्मकता समजून घेण्यास मोठी मदत झाली, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष सरावामुळे अक्षरलेखनातील आत्मविश्वास वाढल्याचेही सहभागींच्या मनोगतातून स्पष्ट झाले.
समारोप कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी सुलेखनामुळे व्यक्तिमत्त्व विकासास मोठी मदत होते, असे प्रतिपादन केले. सुलेखनाच्या माध्यमातून एकाग्रता, संयम, शिस्त, सातत्य आणि सर्जनशीलता यांसारख्या गुणांचा विकास होतो. एखादे अक्षर सुंदर आणि प्रमाणबद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य विद्यार्थ्यांच्या स्वभावात शिस्त आणि संयम निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
या चार दिवसीय कार्यशाळेत एकूण २० जणांनी सहभाग नोंदविला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात लोप पावत चाललेल्या सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखनाच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा सहभागींसाठी मार्गदर्शक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना देवनागरी सुलेखनाची मूलभूत तत्त्वे समजण्याबरोबरच प्रत्यक्ष सरावातून या कलेची गोडी निर्माण झाली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. बी. जी. गायकवाड यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर डॉ. मनीषा मुजुमदार यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles