– नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर; ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे राणेंचे आवाहन.
कुडाळ : शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर करण्याआधीच जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेली, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे तसेच देशपातळीवर लौकिक मिळवून देण्याचे मोठे श्रेय जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना जाते, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे नूतन वास्तूत स्थलांतर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडले. नेरूर-देऊळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या इमारतीत हे शाखा कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेला कोणताही डाग लागू न देता प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे काम मनीष दळवी यांनी केले आहे. बँकेला शिस्त लावली असून त्याचे रूपांतर आजच्या नफ्यात दिसून येत आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबरोबरच बँकेचा कारभार प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सांभाळला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
“मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी करण्यापूर्वीच जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावली. बँक आधी धावली आणि त्यानंतर सरकारने मदत जाहीर केली. महाराष्ट्रात असे उदाहरण पहिल्यांदाच घडले,” असे निलेश राणे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तुंग कामगिरी केली असून त्याचे श्रेय अध्यक्ष मनीष दळवी यांना जाते, असे सांगत राणे यांनी बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी-कर्मचारी वर्गाचेही कौतुक केले. ग्राहकांना भविष्यात आणखी दर्जेदार आणि गतिमान सेवा मिळावी, यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
“सामान्य शेतकरी बँकेपर्यंत नव्हे, तर बँक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे!”
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या आगामी वाटचालीचा आढावा मांडला. “सामान्य शेतकरी आणि ग्राहकापर्यंत बँक पोहोचली पाहिजे. ग्राहक बँकेत आल्यानंतर त्याला समाधान मिळाले पाहिजे. त्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बँकेने ८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याचे दळवी यांनी सांगितले. ग्राहकांनी बँकेवर मोठा विश्वास ठेवला असून त्या विश्वासाला आणि सहकार्याला न्याय देणे ही बँकेची बांधिलकी आहे. ग्राहकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत बँकेचा विस्तार आणि सेवा अधिक सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“निलेश राणे यांनी या मतदारसंघात ज्या-ज्या शाखांचे उद्घाटन केले, त्या सर्व शाखांनी प्रगती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करत आहोत,” असे मनीष दळवी यांनी नमूद केले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोरे, विद्याप्रसाद बांदेकर, सौ. नीता राणे, संदीप परब, व्हीक्टर डान्टस, रवींद्र मडगावकर, कुडाळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष केशव नारकर, नेरूरच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर, कवठीच्या सरपंच सौ. स्वाती करलकर, वालावलचे सरपंच राजेश प्रभू, महादेव विकास संस्थेचे अध्यक्ष मंगेश बांदेकर, चिंदवन विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नेरूर शाखा व्यवस्थापक सौ. युगा पेडणेकर, बँक अधिकारी श्याम सरमळकर, निलेश कनयाळकर यांच्यासह बँकेचे ग्राहक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नवीन शाखेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेच्या वतीने जागामालक बापू सडवेलकर यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी हित, ग्राहकांचा विश्वास आणि आधुनिक बँकिंग सेवांचा विस्तार या त्रिसूत्रीवर जिल्हा बँकेची सुरू असलेली वाटचाल नेरूर शाखेच्या नव्या वास्तूच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.



