‘सेवा अभियान’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद, ३५० प्रश्न प्रशासनापुढे! ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू! : आ. प्रमोद जठार.

सावंतवाडी :  भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.

“सरकार केवळ घोषणा करणारे नव्हे, तर समस्यांवर ‘सोल्युशन’ देणारे असले पाहिजे. प्रत्येक सामान्य नागरिकाला मंत्रालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणे शक्य नसते. त्यामुळे नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे यांच्यावर महाराष्ट्रभर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, विविध जिल्ह्यांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.

सावंतवाडीतील अभियानात सुमारे ३५० प्रश्न आणि समस्या नागरिकांकडून प्राप्त झाल्या. वीज, पाणी, रस्ते, विकासकामे, निधी आणि अन्य नागरी प्रश्नांचा त्यामध्ये समावेश आहे.

“केवळ गाऱ्हाणी ऐकून थांबायचे नाही, तर प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. सत्ता आल्यानंतर सत्तेच्या धुंदीत सामान्य जनतेकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी भावना निर्माण होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे जठार यांनी सांगितले.

आज प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्षांकडून संबंधित मंत्र्यांना सूचना केल्या जातील आणि प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. येत्या काळात सिंधुदुर्गातील उर्वरित दोन्ही विधानसभा मतदारसंघांतही हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘रोजगारासाठी कारखाने हवेतच, पण आपल्या मुलांचा हक्काचा रोजगारही हवा!’

शिक्षक भरतीत सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या; मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेणार ! : आमदार प्रमोद जठार

सावंतवाडी : फॅक्टरी आणि उद्योग आले तर रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच; मात्र, आपल्या भूमीत निर्माण होणाऱ्या रोजगारात आपल्या मुलांचा वाटा किती? हा सवाल आता गांभीर्याने विचारण्याची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे डोंगरी जिल्हे असून, येथील शिक्षक भरतीत ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी केली.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, गावागावातील जिल्हा परिषद शाळा टिकाव्यात आणि रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबावे, यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक आमदार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा मुद्दा ठोसपणे मांडणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले.

‘शिक्षक नाहीत म्हणून गावातील मुले शहराकडे; गाव ओस पडण्याची वेळ’

आमदार जठार म्हणाले की, शिक्षकांची कमतरता ही केवळ शिक्षणाची समस्या नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्था आणि गावांच्या अस्तित्वाशी जोडलेली बाब आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने अनेक पालक आपल्या मुलांना शहरातील शाळांमध्ये पाठवत आहेत. परिणामी गावातील शाळा ओस पडत आहेत आणि हळूहळू गावांमधून लोकसंख्येचे स्थलांतर वाढत आहे.

“सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी स्थानिक शिक्षकांना संधी मिळणे गरजेचे आहे. आपल्या मुलांनी शिक्षण घेतलेल्या मातीतच शिक्षक म्हणून सेवा करावी आणि रोजगारही मिळावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

पेसा कायद्यानुसार आदिवासी भागातील नागरिकांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. त्याच धर्तीवर डोंगरी आणि भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठीही स्थानिकांना विशेष प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. “दर दहा किलोमीटरवर येथील बोलीभाषा बदलते. स्थानिक परिस्थिती, भाषा आणि संस्कृतीची जाण असलेला शिक्षक विद्यार्थ्यांशी अधिक प्रभावीपणे जोडला जातो,” असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षकांपुरतेच नाही, महसूल-आरोग्यासह सर्व विभागांत स्थानिकांना संधी

स्थानिकांना रोजगार देण्याची ही मागणी केवळ शिक्षक भरतीपुरती मर्यादित नसून महसूल, आरोग्य आणि इतर शासकीय विभागांत निर्माण होणाऱ्या पदांमध्येही स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य मिळावे, अशी व्यापक भूमिका जठार यांनी मांडली.

“फॅक्टरी, उद्योग आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत; मात्र रोजगाराला कालमर्यादा असते. आज गावातील माणूस बाहेर जात आहे. आपल्या जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या सरकारी रोजगारात आपल्या मुलांना हक्काचा वाटा मिळाला, तर गावाकडे पुन्हा रोजगाराचे चक्र फिरू शकते,” असे ते म्हणाले.

मनुस्मृतीच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर जठारांची टीका

दरम्यान, पुणे येथे राहुल गांधी यांनी मनुस्मृतीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार जठार यांनी काँग्रेसवर टीका केली.

“मनुस्मृती ही प्राचीन काळातील ग्रंथपरंपरेचा भाग आहे. काळानुसार त्यामध्ये अनेक बदल झाले असून चुकीच्या प्रथा आणि बाबींवरही चर्चा झाली आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांना मनुस्मृतीवरच आक्षेप का? बायबल आणि कुराणासह विविध धर्मग्रंथांशी संबंधित सामाजिक प्रश्नांवरही ते बोलण्याची तयारी दाखवणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नगरसेवक व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, प्रसन्न देसाई, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, मधू देसाई, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा आता ऐरणीवर –

उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीबरोबरच स्थानिकांच्या हक्काच्या रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी पुढे आल्याने सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील शिक्षक भरतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकारानंतर या मागणीवर शासनस्तरावर काय निर्णय होतो, याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles