सांगेलीच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’ची साथ! ; विविध प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सरपंच लहू भिंगारे यांचे निवेदन.

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत सांगेली गावातील विविध प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी करत सांगेलीचे सरपंच लहू भिंगारे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.


सांगेली गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, विकासकामांतील अडचणी तसेच आवश्यक नागरी सुविधांबाबत या निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी संबंधित विभागांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सरपंच लहू भिंगारे यांनी केली.
सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित ‘सेवा अभियान’ कार्यक्रमादरम्यान हे निवेदन अभियानाचे संयोजक आमदार प्रमोद जठार तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. साखरे यांच्याकडे सादर करण्यात आले.
गावाच्या विकासासाठी एकत्रित पाठपुरावा
‘सेवा अभियानाच्या’ माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्थानिक समस्या थेट शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न होत आहे. सांगेली गावातील प्रश्नांबाबतही ठोस पाठपुरावा करून त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सरपंच लहू भिंगारे यांनी व्यक्त केली.
गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना चालना मिळाल्यास नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होऊन सांगेलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडल अध्यक्ष सुधीर आरिवडेकर, सौ. मोहिनी मडगावकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, ॲड . सिद्धार्थ बांभुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सांगेलीच्या विकासाच्या प्रश्नांना आता ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून बळ मिळाले असून, निवेदनातील मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles