सावंतवाडी शहरात पुन्हा ‘पोलीस चौकी’ सुरू करा! ; उभा बाजार-चितार आळी येथे चौकी सुरू करण्यासाठी ‘सेवा अभियान’मध्ये ॲड. संजू शिरोडकर यांचे निवेदन.

सावंतवाडी : शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्वी कार्यरत असलेली पोलीस चौकी पुन्हा उभा बाजार-चितार आळी येथे सुरू करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ दरम्यान याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.

सावंतवाडी शहरात पूर्वी मध्यवर्ती ठिकाणी पोलीस ठाणे कार्यरत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी हे पोलीस ठाणे अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना पोलीस सेवेसाठी दूरवर जावे लागत असून, आपत्कालीन परिस्थितीतही अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी भाजपा सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी नागरिकांच्या सोयीसाठी उभा बाजार-चितार आळी परिसरात पुन्हा पोलीस चौकी कार्यरत करण्याची मागणी केली. त्यांनी हे निवेदन ‘सेवा अभियान’चे संयोजक आमदार प्रमोद जठार तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. साखरे यांच्याकडे सादर केले.

शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस चौकी सुरू झाल्यास नागरिकांना तातडीने पोलीस सेवा उपलब्ध होण्याबरोबरच गुन्हेगारीवर प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

‘सेवा अभियानातून’ नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ!

भाजपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाच्या’ माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. सावंतवाडी शहरातील पोलीस चौकीचा प्रश्नही या अभियानाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरीप, भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडल अध्यक्ष सुधीर आरिवडेकर, सौ. मोहिनी मडगावकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, ॲड . सिद्धार्थ बांभुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; पोलीस चौकीसाठी आता पाठपुरावा किती वेगाने होतो, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles