बीड : बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात बघाल तिथे कांदा असं चित्र दिसणं तसं कठीणच. सोयाबीन, बाजरी, चारा अशी पारंपरिक शेती करणाऱ्यांचंच प्रमाण अधिक. कांदा निर्यातशुल्कामध्ये कांद्यांचे भाव घसरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. इथून पुढं एक दोन एकरात तरी कांदा लावायचा का नाही अशा संभ्रमात शेतकरी असताना बीडमधील आष्टी तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने त्याच्या तब्बल ३३ एकराच्या शिवरात फक्त कांद्याचीच लागवडकरून टाकलीये. या शेतक ऱ्याची सध्या मोठी चर्चा असून जिल्ह्यातील शेतकरीही याकडे आश्चर्यानंच पहाताना दिसतायत.
पंकज पठाडे या युवा शेतकऱ्यानं १५ लाख रुपये खर्च करून तब्बल ३३ एकरावर कांदा लागवड केली आहे. मागील दहा दिवसांपासून आष्टीच्या या शेतकऱ्याच्या शेतावर १०० हून अधिक महिलांसह आणि अनेक मजूरांची रेलचेल आहे. जून महिन्यात सात आठ एकरांसाठी तयार केलेल्या कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात हे सगळे मजूर सध्या व्यस्त आहेत. या शेतकऱ्याला ९० लाख रुपयांची अपेक्षा असून कांदा पिकाकडून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच आशा सोडल्याचे चित्र असताना बीडच्या या तरुणाच्या धाडसांचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नवल वाटतंय.
९० लाखांच्या कमाईची अपेक्षा –
युवा शेतकरी पंकज पठाडेंना कांद्याच्या पिकातुन मोठी आशा आहे. आता जवळपास २० ते २२ एकरात त्यांची कांदा लागवड पूर्ण झाली असून ३३ एकरातून येणाऱ्या कांद्याकडून त्यांना ९० लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी १०० हून अधिक महिला मजूरांना या कामासाठी नेमलंय. मजुरांना रोजचा खर्च द्यायचा म्हटला तरी आठवड्याचा खर्च ७० ते ८० हजाराच्या घरात जाणारा. सिंचनासाठी या शेतकऱ्याने शिवारात ड्रिप बसवले आहे. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख खर्च आला असून आतापर्यंत असा १८ ते २० लाख रुपये या शेतकऱ्याचा एकूण खर्च आहे. यातून त्याला साधारण ९० लाख रुपये कमाईची अपेक्षा आहे.
100 हून अधिक महिला कामगारांची लागवडीसाठी नेमणूक –
या शेतकऱ्यानं १०० हून अधिक महिलांसह अनेक मजूरांना कांदा लागवडीसाठी नेमलंय. सध्या रोज सकाळपासून हे सगळे मजूर पंकज पठाडेंच्या शेतात लागवडीसाठी येतात. सध्या २० ते २२ एकरावर कांदा लागवड पूर्ण झाली असून शेतकऱ्याच्या धाडसाचं फळ त्याला मिळतंय का? हे येणारा काळच ठरवेल.