मुंबई : मुंबई आणि विजयदुर्ग दरम्यान रो-रो सेवा 1 मार्च 2026 रोजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा समुद्री प्रवासासाठी जलद आणि अधिक आरामदायी पर्याय आहे. अशातच आता मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणात जाणाऱ्यांना फायदा होणार !
मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवाशांना प्रवासाचा चांगला पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा कोकणात जाणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या सेवेला हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी मंत्री कदम यांनी केली आहे.



