सावंतवाडी : तालुक्यातील कोंडुरा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी करत माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुका प्रमुख सुशिल रुपाजी चौगुले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी यांना समजपत्र सादर केले आहे. या प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
सदर समजपत्रात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887, ऑनलाइन जुगार 2023 चे कलम 112(1) तसेच शासन निर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे. श्री. चौगुले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यात कोंडूरा या ठिकाणी तसेच काही ठिकाणी अवैध जुगार व्यवसाय सुरू असून त्यामुळे युवकवर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे वळत आहे. तसेच समाजात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी काही पोलीस कर्मचारी या व्यवसायाला पाठबळ देत असल्याचा आरोप करत संबंधितांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील चौकशी अहवाल आणि संबंधित खुलासे लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन २४ तासांच्या आत कारवाई सुरू करावी, अन्यथा पुढील पुराव्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर करण्यात येईल, असा इशाराही समजपत्रातून देण्यात आला आहे. हे समजपत्र १४ मे २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी यांना सादर करण्यात आले.



