पावसाळी साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने करावे योग्य नियोजन! ; युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला निवेदन सादर.

बांदा : पावसाळा तोंडावर आला असताना पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, सर्पदंश आणि रेबीजसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन युवासेना तालुका प्रमुख रियाज बशीर खान यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला निवेदन देत तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी पांडुरंग नाटेकर, राजेश विरनोडकर, भैय्या गोवेकर, सैफान खान, युवासेना उपतालुका प्रमुख मोईन खान यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या येत असल्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहून आवश्यक औषधसाठा, विविध वैद्यकीय तपासण्या आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवाव्यात, अशी ठाम भूमिका खान यांनी मांडली.
विशेष म्हणजे, सर्पदंश आणि रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा ठेवण्याची, तसेच गरोदर मातांसाठी आवश्यक सुविधा आणि औषधे उपलब्ध करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील सार्वजनिक विहिरी व पाणी स्रोतांची तपासणी करून दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.

“आजार वाढल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असा संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात आरोग्य विभाग कितपत सज्ज राहतो, याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles