सावंतवाडी : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठी रणनीती आखत पक्षबांधणीला वेग दिला आहे. निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच ठाकरे गटाने जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नवे राजकीय समीकरण उभे करत संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड करत त्यांच्यावरील विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे. तर युवासेनेतून आक्रमक शैलीत राजकारण करणारे सुशांत नाईक यांच्याकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाची धुरा सोपवून पक्षाने युवा नेतृत्वाला मोठी संधी दिली आहे. या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा ठाकरे सेनेचे मुखपत्र दैनिक सामना मधून करण्यात आली.
सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, आणि परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना नव्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सावंतवाडी मतदारसंघात गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रभावी लढा उभारण्यात रुपेश राऊळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधकांसमोर सक्षम आव्हान उभे केले. नगराध्यक्षपदासाठी थेट उमेदवार जाहीर करणे, निवडणुकांमध्ये सक्षम चेहरे रिंगणात उतरवणे आणि एकही जागा बिनविरोध जाऊ न देण्याचा निर्धार यामुळे त्यांची पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली. त्याच कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दुसरीकडे, युवासेनेच्या माध्यमातून कणकवलीत आक्रमक राजकीय भूमिका घेणारे सुशांत नाईक यांनी स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री आणि खासदारांवर थेट टीका करत त्यांनी ठाकरे सेनेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली. त्यांच्या या आक्रमक आणि संघर्षशील कार्यशैलीची दखल घेत पक्षाने त्यांना मुख्य शिवसेनेत आणत कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण –
या नव्या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सावंतवाडी आणि कणकवली या दोन्ही मतदारसंघांत संघटनात्मक ताकद वाढवत ठाकरे सेना निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय चुरस आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


