✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी/ पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी १२ जून २०२६ पासून पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध भागांतून शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक रविकिरण गवस यांनी पंढरपूर येथे जाऊन आमदार रोहित पवार यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, कृषी क्षेत्रातील वाढते संकट आणि शासनाच्या धोरणांविरोधात आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून त्याला दिवसेंदिवस व्यापक लोकसमर्थन मिळत आहे.
रविकिरण गवस यांच्या भेटीमुळे कोकणातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात राज्यभरातील कार्यकर्ते एकवटत असल्याने आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


