कळणेचा इतिहास पुन्हा नकोचं!, दलालांपासून सावध राहा! – आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांना साक्षी वंजारींचा मौलिक सल्ला. ; मायनिंग विरोधी लढ्याला काँग्रेसचा दमदार पाठिंबा.

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव आणि परिसरातील निसर्गसंपन्न डोंगररांगांवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाचे संकट घोंगावत असताना, या प्रकल्पाविरोधातील जनआंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी या आंदोलनाला संपूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर करत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच आंदोलक ग्रामस्थांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.

“हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून स्थानिक जनतेच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व आणि नियंत्रण शेवटपर्यंत ग्रामस्थांच्याच हातात राहिले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, मायनिंगसाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया म्हणून कंपनीकडून आजगाव व आसपासच्या परिसरात ड्रोन सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणाला जिल्हा परिषद सभागृहात अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात असताना हा ठराव मंजूर झाला. यावरून साक्षी वंजारी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

“ठराव मंजूर होत असताना शिवसेना-भाजपाचे सदस्य गप्प का होते? जनतेला याचे उत्तर द्यावे लागेल. आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर या संपूर्ण प्रकरणावर मूग गिळून का बसले आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना आपल्या मतदारसंघात कोणता प्रकल्प येणार याची माहिती नसल्याचे सांगणे हास्यास्पद आहे. उलट, प्रकल्पाची माहिती आधीच मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या मंडळींकडून परिसरातील जमिनींची खरेदी सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला.

“गावात येऊन नौटंकी करण्यापेक्षा सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करून दाखवा. त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घ्यावा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

कळणेचा इतिहास पुन्हा घडू देऊ नका!

आजगावमधील आंदोलनाला इशारा देताना वंजारी म्हणाल्या की, कळणे मायनिंगविरोधी आंदोलनाचा अनुभव ग्रामस्थांनी विसरू नये. त्या वेळी आंदोलनाचे नेतृत्व काही मोजक्या व्यक्तींकडे गेले आणि हळूहळू ते स्थानिकांच्या हातातून निसटले. पुढे मायनिंग कंपनीसाठी दलाली करणारेच आंदोलनात सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले.

“आजगावच्या ग्रामस्थांनी हा इतिहास पुन्हा घडू देऊ नये. कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आंदोलन शेवटपर्यंत जनतेच्या नियंत्रणात ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या संपूर्ण संघर्षात काँग्रेस पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे साक्षी वंजारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजगाव मायनिंगविरोधी लढ्याला आता अधिक राजकीय धार मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles