सावंतवाडी : “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, ती साकार करण्यासाठी अथक परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाची कास धरावी. डिजिटल क्रांतीच्या युगात मोबाईल आणि ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून स्वतःची क्षमता विकसित केली, तर सिंधुदुर्गातील विद्यार्थी देशपातळीवर नव्हे तर जागतिक स्तरावरही आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील,” असा आत्मविश्वास पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केला.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी तब्बल ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, स्टेपिंग ग्लोबल स्कूलचे संचालक अॅड. रूजूल पाटणकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अश्विनी लेले, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, पत्रकार आनंद धोंड, माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुशील चौगुले, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न उर्फ बाळू देसाई, पर्यावरण संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब, डी. एस. जांभेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाईलचा सदुपयोग करा, एआयला संधी समजा!
पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, “आयुष्यात आपण स्वतःच्या कर्तृत्वावर घडलं पाहिजे. मोबाईलमधून चांगल्या गोष्टी आत्मसात करा. आज डिजिटल क्रांती झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे युग सुरू झाले आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.”
“स्वप्नं पाहण्याची हिंमत ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने कष्ट करा. सिंधुदुर्गातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश संपादन करून उज्ज्वल भविष्य घडवतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक पाया भक्कम करा; अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा! – तहसीलदार श्रीधर पाटील
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला शैक्षणिक पाया भक्कम करण्यावर भर द्यावा. शाळेतील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनवा. गुणवत्तेला प्राधान्य देतानाच अवांतर वाचनाची सवय लावा. याचा स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच फायदा होतो.”
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा दाखवावी. आज विविध क्षेत्रांत करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निश्चित करून डिजिटल साधनांचा योग्य वापर करत स्वतःला स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.
“सिंधुदुर्गातून अधिकारी घडविण्यासाठी पालक-शिक्षकांनी पुढाकार घ्यावा” – दयानंद कुबल
संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, “सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावे, अधिकारी व्हावे, यासाठी पालकांनी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था निश्चितपणे सहकार्य करेल.”
“पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना योग्य मार्गदर्शन केले, तर सिंधुदुर्गातील विद्यार्थी भविष्यात जगाच्या नकाशावर आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनीही सजग राहावे : PSI माधुरी मुळीक
पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. “सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत पुढे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; मात्र या विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातून अधिकाधिक चांगले अधिकारी घडावेत, ही अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. मुलांच्या ऑनलाइन वर्तणुकीकडे पालकांनी लक्ष द्यावे आणि मुले कोणत्याही चुकीच्या कचाट्यात सापडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुलांची क्षमता ओळखा; त्यांच्या स्वप्नांना पंख द्या! – डॉ. अश्विनी लेले
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अश्विनी लेले म्हणाल्या, “विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन यश मिळवतात. त्यांच्या या यशामागे पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.”
पालकांनी मुलांच्या स्वप्नांना प्राधान्य देत त्यांच्या क्षमता ओळखाव्यात. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील अभ्यासक्रमाची निवड करून त्यात प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

कोकण कला संस्थेचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत अन् प्रेरणादायी! : प्रा. रूपेश पाटील
सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असे सामाजिक कार्य दयानंद कुबल यांच्या माध्यमातून सुरू आहे. संस्थेचा प्रत्येक उपक्रम दर्जेदार असून त्यांच्या सामाजिक कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे,” असे ते म्हणाले.

शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, युवा विकास, शेती आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय काम उभे केले असून या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो, असेही प्रा. पाटील यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिर्के यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळांचा गौरव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.








