ओरोस : बालविवाह लावून दिल्याच्या आरोपावरून कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना ओरोस येथील मा. विशेष न्यायाधीशांनी नियमित जामीन मंजूर केला आहे. दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी हा आदेश पारित केला.
या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६८(२)(i), ६८(२)(m), ५४ तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ मधील कलम ९, १०, ११ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपींनी तिचा विधिविरुद्ध बालकाशी बालविवाह लावून दिला आणि त्यानंतर दोघांना एकत्र वास्तव्य करण्यास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा
आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद केला. आरोपींवर प्रत्यक्ष मुख्य गुन्ह्याचा आरोप नसून त्यांच्यावर केवळ सहाय्य (Abetment) केल्याचा आरोप आहे. तसेच प्रकरणातील परिस्थिती आणि आरोपींची भूमिका लक्षात घेता त्यांना कोठडीत ठेवणे आवश्यक नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आवश्यक अटी व शर्तींसह नियमित जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांच्यासह ॲड. नामदेव मडकर, ॲड. योगेश खेडकर, ॲड. विनय विजय राजपूत, ॲड. के. शेख तसेच ॲड. भूषण कदम यांनी काम पाहिले.
दरम्यान, जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणातील आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे.



