सावंतवाडी : मुळ लाभधारकांच्या नावावर मंजूर झालेले गाळे अन्य व्यक्तींकडून वापरले जात असल्याच्या तक्रारीवरून सावंतवाडी नगरपरिषदेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील तब्बल तीन गाळे पालिका प्रशासनाने सील केले आहेत. त्यामुळे गाळे वाटप आणि त्यांच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, मुंज यांच्या आंदोलनाला प्राथमिक स्वरूपात यश मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

या कारवाईला पालिकेच्या कर विभागाचे अधिकारी गोविंद गवंडे यांनी दुजोरा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित गाळे ज्या लाभधारकांना मंजूर करण्यात आले होते, त्यांच्या ऐवजी अन्य व्यक्ती गाळ्यांचा वापर करत असल्याचे पालिकेच्या तपासणीत निदर्शनास आले.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंजूर लाभधारकांऐवजी अन्य व्यक्ती गाळ्यांचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधितांना २४ तासांत गाळे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र, नोटीस देऊनही संबंधितांकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने अखेर पालिका प्रशासनाने तीनही गाळ्यांना थेट सील ठोकले.
दरम्यान, सील करण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये संबंधितांच्या जीवनावश्यक वस्तू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या वस्तूंबाबत पुढील निर्णय मुख्याधिकारी घेणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
‘वरवरची कारवाई नको, गुन्हा दाखल करा!’ – श्रेयस मुंज
पालिका प्रशासनाच्या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी मात्र आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. गाळ्यांच्या गैरवापराबाबत आपल्या अनेक मागण्या असून, केवळ गाळे सील करून प्रश्न संपणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
“पालिकेने केलेली कारवाई ही वरवरची आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मागे हटणार नाही,” अशी भूमिका मुंज यांनी घेतली आहे.
गाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पालिकेने तीन गाळे सील केले असले तरी हा संघर्ष अद्याप संपलेला नसून, आगामी काळात हा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता आहे.
गाळे सील झाले; पण श्रेयश मुंज यांचा लढा थांबणार का? याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.



