वेंगुर्ले : घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत मिळत नाही, ग्राहकांची बुकिंग परस्पर रद्द केली जाते, तसेच गॅस पाईप व रेग्युलेटरच्या नावाखाली सक्तीची वसुली केली जाते, असा गंभीर आरोप करत वेंगुर्ल्यातील गॅस ग्राहकांनी ‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ एजन्सीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्राहकांच्या विविध तक्रारींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत ग्राहकांनी जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
घरपोच सेवेचा बोजवारा?
ग्राहकांच्या निवेदनानुसार, ऑनलाइन पद्धतीने गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही अनेक ग्राहकांना दीर्घकाळ सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ग्राहकांची बुकिंग कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर रद्द केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
पाईप-रेग्युलेटरच्या नावाखाली सक्तीची वसुली
?
गॅस सुरक्षा तपासणी, पाईप आणि रेग्युलेटरच्या नावाखाली ग्राहकांवर अनावश्यक वस्तू घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “गरज नसलेल्या वस्तू घेण्याची सक्ती केली जाते,” असा दावा ग्राहकांनी केला असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिलांसह ग्राहकांशी अरेरावीचा आरोप
एजन्सीचे मालक व कर्मचारी ग्राहकांशी अरेरावीची तसेच अपमानास्पद वागणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग ग्राहकांना योग्य सुविधा किंवा स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सिलिंडर हाताळणीच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
गॅस सिलिंडरची वाहतूक व हाताळणी करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचाही आरोप ग्राहकांनी केला आहे. भविष्यात या निष्काळजीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर राहील, असा इशाराही ग्राहकांनी दिला आहे.
१४ ऑगस्टपर्यंत कारवाईची मागणी; अन्यथा उपोषण
ग्राहकांनी प्रशासनाला १४ ऑगस्टपर्यंत या सर्व तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आता प्रशासन या तक्रारींची कितपत दखल घेते आणि गॅस ग्राहकांच्या समस्यांवर काय तोडगा काढला जातो, याकडे वेंगुर्ल्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



