वेंगुर्ला: शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत पुरुष व महिला शूटींग स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन कॅम्प, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कोकण विभागातील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या युवा नेमबाजांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. राजन गिरप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) धनराज गोस्वामी होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक तरुण भारत, सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक मा. शेखर सामंत उपस्थित होते.
यावेळी कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेटे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे सचिव डॉ. चंद्रकांत नाईक, संस्था प्रतिनिधी मा. सुरेंद्र चव्हाण, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर, उपरकर शूटिंग रेंजचे संचालक मा. कांचन उपरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा सुदाम माने,जिमखाना विभाग प्रमुख डॉ. कमलेश कांबळे आणि पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची रूपरेषा, आयोजनामागील भूमिका तसेच शूटींग या क्रीडाप्रकाराचे महत्त्व स्पष्ट केले.
उद्घाटक मा. राजन गिरप यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना शूटींगमुळे विकसित होणाऱ्या मानसिक क्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शूटींग हा केवळ लक्ष्यावर नेम साधण्याचा खेळ नाही; तर मनाची एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि अचूक निर्णयक्षमता विकसित करणारा क्रीडाप्रकार आहे. लक्ष्य कितीही कठीण असले तरी ते साध्य करण्यासाठी मन स्थिर ठेवणे आणि सातत्याने सराव करणे आवश्यक आहे.”
विजयाबरोबरच स्पर्धेतून मिळणाऱ्या अनुभवाकडेही खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन करताना गिरप म्हणाले की, विजय महत्त्वाचा असला तरी शिस्त, खिलाडूवृत्ती आणि प्रतिस्पर्ध्याचा सन्मान ही क्रीडासंस्कृतीची खरी मूल्ये आहेत. आजचा अनुभव भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात असून, या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि सक्षम व्यासपीठाची गरज आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक तरुण भारतचे संपादक मा. शेखर सामंत यांनी शूटींग क्रीडेचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना सांगितले की, “शूटींग हा संयम, शिस्त आणि मानसिक स्थैर्याची कसोटी पाहणारा खेळ आहे. लक्ष्य समोर असताना आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीपासून मन विचलित न होऊ देता केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. हीच एकाग्रता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनातही अत्यंत उपयुक्त ठरते.”
क्रीडा ही केवळ पदक किंवा गुण मिळविण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मैदानावरील विजयाइतकाच पराभवातून शिकण्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. विजय आणि पराभव समतोलपणे स्वीकारण्याची मानसिकता विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याचे बळ देते, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची क्षमता असून, त्यांना स्थानिक पातळीपासून विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. खर्डेकर महाविद्यालयाने विद्यापीठस्तरीय स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण विद्यार्थ्यांना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. (डॉ.) धनराज गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडाक्षेत्राची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे. केवळ पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्याला परिपूर्ण घडवू शकत नाही. त्यासाठी क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, संशोधन आणि विविध सहशैक्षणिक उपक्रमांची जोड आवश्यक आहे.”
शूटींगसारख्या क्रीडाप्रकारात एकाग्रता, आत्मसंयम, अचूकता, शिस्त आणि मानसिक स्थैर्य या गुणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच मूल्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनातील यशासाठी उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई तसेच कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांमुळे स्पर्धेच्या आयोजनास प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर डॉ. विवेक चव्हाण यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



