सावंतवाडी : ‘भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान’ हे ब्रीदवाक्य घेऊन महसूल व वन विभागाच्या माध्यमातून सावंतवाडीत नागरिकांच्या सेवेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सावंतवाडी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले.

भूमी अभिलेख आणि महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे जमिनीशी संबंधित कामांसाठी नागरिकांना होणारी धावपळ कमी होऊन शासकीय सेवा अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात सायंकाळी ७ वाजता हा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी जिल्हा अधीक्षक अनुप जावळे, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नगरपरिषद सभापती सुधीर आडिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, माजी नगरसेवक उदय नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
‘भू प्रणाम केंद्र’ हे केवळ एक सेवा केंद्र नसून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारे केंद्र ठरणार आहे. भूमी अभिलेख व महसूल विभागाशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी अधिक सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भूमीशी निगडित प्रश्नांच्या सोडवणुकीला वेग देत ‘भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे हे केंद्र सावंतवाडीच्या प्रशासकीय सेवाक्षेत्रात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



