तळवणेत रंगला सांस्कृतिक आणि कलागुणांचा उत्सव, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन! ; स्थानिक कलावंतांना दिले प्रोत्साहन.

सावंतवाडी : गावातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब यांनी केले. ग्रामीण भागातील महिला, युवक आणि बालकलाकारांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे गावातील सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळते, असे मार्गदर्शन करत त्यांनी या आयोजनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.

तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारी ‘तळवणेची गृहलक्ष्मी’, नृत्यकलेचा आविष्कार घडविणारी सोलो डान्स स्पर्धा, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी तळवणे गाव मर्यादित पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच बालक आणि युवकांमधील कलात्मकता, सर्जनशीलता व कल्पकतेला वाव मिळणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक सणांचा आनंद घेत असताना पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला जाणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला तळवणे मठाचे पूज्य मठाधीश राजेंद्र भारती महाराज, जिल्हा परिषद सदस्य सुधन कवठणकर, तळवणेचे सरपंच समीर केरकर, गुळदुवेचे सरपंच शैलेंद्र जोशी, गुळदुवेचे उपसरपंच गणपत शेटकर, भाजपा युवा तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी, भाजपा सरचिटणीस नारायण कांबळी, तळवणेचे माजी उपसरपंच रंजन गावडे, रवींद्र गावडे, सावळाराम घाटये, सुधीर गावडे, सुहास गावडे, काका गावडे, बाबू गावडे, आबा शेटकर, नाना गावडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या उपक्रमामुळे तळवणे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्पर्धांच्या निमित्ताने महिला, युवक आणि बालकलाकारांच्या कलागुणांना नवी झळाळी मिळणार आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक आणि पर्यावरणविषयक जाणीव जागृत करणारा हा उपक्रम तळवणेच्या सांस्कृतिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles