सावंतवाडी : कवठणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने एस आर अतंर्गत बांधलेली काॅक्रेटची संरक्षण भिंत पहिल्याच पावसात धोकादायक बनली आहे. तेथील मातीचा भराव पूर्णतः खचला असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी केला आहे.
तालुक्यात मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामध्ये बांधकाम विभागाच्या विविध विकासात्मक कामांना चांगलाच फटका बसला तर काही ठिकाणी पूर्ण केलेल्या कामातील निकृष्टपणा समोल आला. कवठणी गावात अलीकडेच दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयानजिक लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा मातीचा भराव पुर्णतः खचल्याने ही भिंत धोकादायक बनली आहे. संरक्षण भिंतीच्या पायाला दगड काॅक्रीटचे पिंचिग न करता मातीवरच ही भिंत उभारण्यात आल्याने ती भविष्यात कधीही कोसळू शकते या कामाकडे बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने पूर्णतः दुर्लक्ष केलेले निकृष्ट दर्जाचे हे काम झालेले आहे एकूणच पहिल्याच पावसामध्ये बांधकामाच्या कारभाराचा पोलखोल झाला असून शासनाचे लाखो रुपये यामध्ये वाया जाणार आहेत असा आरोप श्री कवठणकर यांनी केला.
तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेल्या कामाच्या ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला येत असून आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने त्या ठिकाणी रहदारी आणि वाहतूक करणेही धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अशा कामाच्या ठिकाणी भेटी देऊन संबंधित ठेकेदारांना योग्य त्या सूचना द्याव्या असे मागणी होत आहे तर काही ठिकाणी खोदकाम केल्याने नैसर्गिक पाण्याचा मार्ग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे.