सावंतवाडी : कोकण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणारे विविध उपक्रम आदर्शवत असून अत्यंत कौतुकास्पद आहेत असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी येथे व्यक्त केले. अन्न, पाणी आणि निवारा हे जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहेत, ज्यामध्ये पाण्याला “जीवन” असेही म्हटले जाते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आजही स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा गंभीर समस्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीही काहीशी अशीच असून, जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित पाणी उपलब्ध नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. शाळेत उपलब्ध असलेले पाणी बहुधा प्रक्रिया केलेलं नसल्याने पोटदुखी, त्वचारोग व इतर संसर्गजन्य आजारांचा होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात अजूनही स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे, ही खंत स्पष्ट जाणवते. ही गरज लक्षात घेऊन, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आयजीयुस इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ जून २०२५ रोजी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात एकूण ४ महाविद्यालये व १५ शाळांना पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणा प्रदान करण्यात आल्या. यामुळे त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील.
या कार्यक्रमात एकूण ९५ विद्यार्थी, तसेच ४महाविद्यालय आणि १५ शाळेतील शिक्षकवर्ग कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी, श्री.श्रीधर पाटील (तहसीलदार, सावंतवाडी), श्री वासुदेव नाईक, (गट विकास अधिकारी,सावंतवाडी), बँक ऑफ इंडिया लीड बँक मॅनेजर श्री ऋषिकेश गावडे, सकाळचे संपादक श्री शिवप्रसाद देसाई, एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री राजेंद्र शिंत्रे, कोकण संस्था अध्यक्ष श्री.दयानंद कुबल तसेच कोकण संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांनी आपल्या भाषणात कोकण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले, अशा संस्थांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी नितांत गरज आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी अनेक संस्थांना एकत्र आणून कोकण संस्था सिंधुदुर्गच्या विकासात देत असलेल्या योगदानाबद्दल संस्थेचे आभार मानले त्याचबरोबर भविष्यात संस्थेसोबत काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक यांनी आयजीयुस इंडिया कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे शाळेतील मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल व शालेय उपस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील. भविष्यात आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित जनजागृती कार्यक्रम, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन व स्वच्छतागृह सुधारणा यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून हीच दिशा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने मुंबई कार्यालयातून सीएसआर हेड प्रीती पांगे, सुरज कदम, साक्षी पोटे, हर्षला कोल्हे, सिंड्रेला जोसेफ, बिना अहिरे, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत, अमित पाटील, अवंती धुरी, हनुमंत गवस, स्वाती मांजरेकर, समीर शिर्के, अमोल गुराम, प्रदीप पवार, गौरी आडेलकर, वैष्णवी म्हाडगुत,फेमिना डान्टस यांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.