वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित, मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी! ; हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!, नावं, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश.

मुंबई/रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दांत ‘कानउघडणी’ केली. त्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्यस्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक व पात्रांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे.

नेमके प्रकरण काय? :

रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निर्माता श्री. जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज, लांजा निर्मित श्री. अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित अमोल रंगयात्रीतर्फे (लांजा) ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. हे नाटक पाहिल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते संतापले. नाटकात वारकरी भक्तांना चक्क ‘हत्यारे’ म्हणून दाखवून संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे समोर आले.

मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कडक सूचना –

विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री सतीश सोनार व श्री रवी नलावडे यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. या वेळी ना. सामंत यांनी तात्काळ नाटकाच्या निर्मात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले. “नाटकाचे नाव बदला, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पना त्वरित बदला,” अशा कडक सूचना मंत्र्यांनी दिल्या.
निर्मात्यांची लेखी माघार: मंत्र्यांच्या भूमिकेनंतर, नाटक निर्माते ‘वीरशैव समाज, लांजा’ यांनी हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “वारकरी संप्रदाय आणि समितीने घेतलेल्या आक्षेपांचा आदर राखून आम्ही हे नाटक थांबवत आहोत. आक्षेपार्ह प्रसंग आणि नावांमध्ये आवश्यक बदल करूनच पुढील सादरीकरण केले जाईल.”

नाटकातील अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह भाग –
१. विठ्ठलाचे नाव घेणारे दाम्पत्य १० निष्पाप पाहुण्यांची हत्या करते, असे दाखवून वारकरी भक्तांना गुन्हेगार ठरवण्यात आले.
२. नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून होताना दाखवले, जो वारकरी संतांचा मोठा अपमान आहे.
३. आई (जना) ही विठ्ठल नामात बेभान होऊन आपल्याच मुलाची (नामा) हत्या करते, असे अघोरी दृश्य दाखवून समाजाची दिशाभूल करण्यात आली.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन तातडीने जी कारवाई केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”, असे हिंदू जनजागृति समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड, राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles