सावंतवाडी : स्त्री ही आदिमानवापासून कर्तृत्ववान आहे. स्त्री आहे म्हणून जग आहे. स्त्रीमुळेच माणसाला माणसाचे महात्म्य टिकून आहे. म्हणूनच स्त्री हीच शोधाची खरी जननी असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रा. सुषमाताई हरकुळकर यांनी येथे केले. भारतीय बौद्ध महासभा व महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. हरकुळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय घटनेचे शिल्पकार भगवान बुद्ध व सर्व महानायकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रा. हरकुळकर मार्गदर्शन करत होत्या . यावेळी विचारपीठावर केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर, अशोक कदम, तालुका अध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा संघटक ममता जाधव, गौतमी कांबळे, मानसी कदम, रूपाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आपल्या मार्गदर्शनात प्रा. हरकुळकर यांनी स्त्रीच्या प्रगतीचे टप्पे सांगून भारतीय स्त्री ही कशा पद्धतीने पुढारलेली आहे, हे सांगून जागतिक महिला दिन कशा पद्धतीने या देशात आणि जगात सुरू झाला हे स्पष्ट केले. महिला दिन हा उत्सव न होता प्रबोधनाचा दिन साजरा होणे आवश्यक असल्यास ते स्पष्ट केले.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या. त्यामध्ये रुक्मिणी विठ्ठल जाधव – आरोंदा, सत्यवती नवसो जाधव – कारिवडे, जयश्री लाडू जाधव – माजगाव, रुक्मिणी पांडुरंग कदम – सांगेली, अनुसया सिताराम जाधव – इन्सुली, लीलावती सगुण जाधव – सातार्डा, लक्ष्मी नारायण कदम – माणगाव, सुहासिनी बाबी जाधव – कारिवडे, चंद्रकला चंद्रकांत जाधव – साटेली यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी महिलांसाठी खुली घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये दिव्या लक्ष्मण जाधव (आंबोली) हिने प्रथम क्रमांक पटकावला. रोख रुपये 2000/ व सन्मान चिन्ह दिवंगत स्मिता व प्रकाश जाधव झाराप यांच्या स्मरणार्थ रश्मी चौकेकर पुरस्कृत देण्यात आले. द्वितीय क्रमांक सुप्रिया सदानंद जाधव (इन्सुली) हिस रोख रुपये पंधराशे व स्मृतिचिन्ह – दिवंगत गुरुवर्य रूपाजी तेंडुलकर बांदा यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांकडून देण्यात आले. तृतीय क्रमांक विदेशा विशाल जाधव (मळगाव) हिला रुपये 1000/ दिवंगत सोमवती अनंत कदम यांच्या स्मरणार्थ मंगेश कदम यांच्याकडून तर उत्तेजनार्थ प्राची नितेश मेश्राम (तळवणे) पुरस्कृत प्रभावती मोहन जाधव यांच्या स्मरणार्थ चंद्रशेखर जाधव यांसकडून, उत्तेजनार्थ द्वितीय श्रद्धा शांताराम असनकर पुरस्कृत गंगाबाई महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ गणपत जाधव गणपत महादेव जाधव यांजकडून देण्यात आले. तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना रोख पारितोषिक दिपाली दिलीप जाधव यांच्याकडून देण्यात आले.
प्रारंभी तालुका कोषाध्यक्ष अश्विनी जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सूत्रसंचालन मानसी कदम व ममता जाधव यांनी केले तर आभार गौतमी कांबळी यांनी आभार प्रदर्शन केले.
दुपारच्या सत्रात विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्याला उस्फूर्त बक्षीसेही देण्यात आले. हा कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रमाला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



