खर्डेकर महाविद्यालयात ‘तिच्या कविता – तिचे गाणे’ रंगले. ;  महिला शक्तीचा झाला जागर!

वेंगुर्ला : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील महिला विकास कक्षाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तिच्या कविता – तिचे गाणे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या संवेदनशील भावना, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चेंदवणकर उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि सकारात्मक विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवणे आणि समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागणे गरजेचे असून महिलांनीही सामाजिक जबाबदारी स्वीकारून विविध क्षेत्रांत आपली भूमिका प्रभावीपणे बजावली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासातही योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाटील होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे, तर आर्थिक स्वावलंबनासाठी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली महिला कुटुंब व समाजात अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते आणि तिचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षमपणे विकसित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, कौशल्य आणि जिद्दीच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडावी, असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. मनीषा मुजुमदार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. महिलांच्या कलागुणांना आणि विचारांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक जाण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नव्या संकल्पना रुजवण्याचा दिवस आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या, तर काहींनी नामवंत कवींच्या कवितांचे भावपूर्ण वाचन केले. याशिवाय काही विद्यार्थिनींनी स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नाती आणि जीवनातील विविध भावनांवर आधारित गीते सादर करून कार्यक्रमात वेगळीच रंगत निर्माण केली. या सादरीकरणातून महिलांच्या मनातील भावना, संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वास प्रभावीपणे व्यक्त झाला. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी श्रद्धा पालव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष कला शाखेतील स्वरा गंगावणे यांनी प्रभावी शैलीत केले, तर प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील महिमा केळुसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या सुविद्य पत्नी , प्राध्यापिका यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आपले विचार, भावना आणि कलागुण व्यक्त करण्याची प्रेरणादायी संधी मिळाली. त्यामुळे महाविद्यालयात महिला दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles