‘क्वायर बोर्ड’च्या उद्यमिता विकास कार्यक्रमातून ग्रामीण विकासाला चालना! : प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी.

वेंगुर्ला : ‘क्वायर बोर्ड’च्या वतीने अणसुरपाल ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उद्यमिता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना काथ्या उद्योगाबाबत विविध प्रकारची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी क्वायर बोर्डचे रिजनल ऑफिसर श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे, अणसुर गावचे सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच मालवणकर मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, प्रज्ञाताई परब, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.एस. एच. माने, ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. विवेक चव्हाण, डॉ. सचिन परूळकर, डॉ. जी. पी. धुरी, प्रगती चव्हाण, साखरे मॅडम, लेखापाल स्वामीआदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एम. के. गावडे यांनी महिलांना काथ्या उद्योगाचे महत्त्व, त्यातील व्यवसायाच्या संधी आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये क्वायर बोर्डचे रिजनल ऑफिसर श्रीनिवासन यांनी काथ्यापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, तसेच ग्रामीण भागातील महिलांनी या उद्योगाचा लाभ घेत स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रोग्राम ऑफिसर साखरे मॅडम यांनी काथ्या उद्योगासंदर्भात शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि प्रशिक्षणाच्या संधींबाबत महिलांना सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थित महिलांशी संवाद साधला. क्वायर बोर्डचा हा उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारा असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले आणि सहभागी महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. विवेक चव्हाण यांनी ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देत महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्याचे आवाहन केले.
या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुमारे ५० महिलांनी सहभाग घेत लाभ घेतला. तिसऱ्या दिवशी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली असून त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परूळकर यांनी केले तर प्रगती चव्हाण यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles