सावंतवाडी : “प्रबोधनातूनच खरे समाज परिवर्तन घडते,” हा मूलमंत्र अधोरेखित करत सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव यांनी समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केलेले विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे ठरले.
येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती यांच्या वतीने भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सुस्मिता जाधव यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ श्रद्धास्थान नाहीत, तर ते आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या संविधानामुळेच माझ्यासारख्या सामान्य मुलीला पंचायत समिती सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली. हा माझा नव्हे, तर संविधानाचा सन्मान आहे.”
त्यांनी पुढे जयंती उत्सवाच्या स्वरूपावर भाष्य करताना ठामपणे नमूद केले की, जयंती केवळ करमणुकीचा भाग न ठरता ती प्रबोधनाची चळवळ व्हावी. कारण विचारांची क्रांतीच समाजात खरे परिवर्तन घडवते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कविता निगुडकर, प्रियदर्शनी जाधव, भावना कदम, परीक्षक म्हणून आनंद आचरेकर, महेश तळगावकर, डॉ. निलेश अटक, डॉ. पारवे, पत्रकार मोहन जाधव तसेच तांत्रिक सहाय्यक सातोस्कर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
प्रारंभी सचिव सगुण जाधव यांनी प्रभावी प्रास्ताविक करत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
उद्घाटक शुभदा देवी भोसले यांनी आपल्या भाषणात सावंतवाडीच्या राजघराण्याचा गौरवपूर्ण इतिहास उलगडत, न्याय, नीती आणि तत्त्वज्ञान यांचा संगम म्हणजे सावंतवाडीचे राज्य असल्याचे सांगितले. त्यांनी डॉ. आंबेडकर आणि राजघराण्याच्या विचारसरणीतील साम्य अधोरेखित करत, अशा सामाजिक उपक्रमांना राजघराण्याचा कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाची एक वेगळी आणि समाजोपयोगी बाजू म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली आरोग्य तपासणी शिबीर. डॉ. निलेश अटक, डॉ. पारवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून आरोग्य जागरूकतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
भीम गीत गायन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले—
प्रथम : प्रज्ञा सूर्य महिला समूह, आसोली — ₹5000
द्वितीय : उत्कर्ष महिला समूह, आडेली — ₹3000
तृतीय : पंचशील महिला समूह, सरमळे — ₹2000
उत्तेजनार्थ :
रमाई कलाविष्कार, मडुरा — ₹1000
सिद्धार्थ महिला समूह, नेमळे — ₹1000
सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात “रमाईची साडी” हा प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक बहारदार कार्यक्रम राहुल कदम यांनी सादर केला. या उपक्रमाला अनंत कदम आणि भावना कदम यांचे प्रायोजकत्व लाभले. या स्पर्धेत रश्मी चौकेकर या विजेत्या ठरल्या असून, त्यांना सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते साडी व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक जाणीव, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि आरोग्याची काळजी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. भीम गीतांच्या माध्यमातून केवळ स्वरांची मैफल रंगली नाही, तर विचारांचे बीजही रोवले गेले. सावंतवाडीतील हा उपक्रम म्हणजे प्रबोधन, परंपरा आणि परिवर्तन यांचा सुरेख मिलाफ ठरला.



