✍️ प्रा. रुपेश पाटील.
“दगड-धोंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली तरी वर्षानुवर्षे इथल्या मातीत नररत्ने जन्माला येतात आणि म्हणूनच या मातीला ‘महाराष्ट्र’सारखे दुसरे नाव शोभून दिसत नाही!,” असे थोर साहित्यिक, पत्रकार आणि जननेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटले होते. या एका वाक्यात महाराष्ट्राच्या मातीतल्या तेजस्वी परंपरेचा आणि संघर्षातून घडलेल्या नेतृत्वाचा संपूर्ण इतिहास दडलेला आहे. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांपासून ते कोकणच्या हिरव्यागार किनाऱ्यांपर्यंत अनेक थोर समाजपुरुष, लोकनेते आणि विचारवंत या मातीत जन्माला आले.


धरणीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणभूमीतल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही अशाच कर्तृत्ववान नेतृत्वाचा समृद्ध वारसा लाभला. समाजकारण, शिक्षण, आरोग्य आणि जनसेवा यांची अखंड ज्योत पेटवत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री स्वर्गीय भाई सावंत हे त्यातील एक तेजस्वी पर्व ठरले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यांत शिक्षणाची गंगा अवतरली; आरोग्य सेवांचे जाळे उभे राहिले; सर्वसामान्यांच्या आयुष्यात विकासाची नवी पहाट उगवली. हा केवळ इतिहास नाही, तर विकासाच्या स्वप्नांना पंख देणारा प्रेरणादायी अध्याय आहे.




हीच वैचारिक मशाल पुढे नेत स्वर्गीय शिक्षणमहर्षी विकासभाई सावंत यांनी समाजकारणाला माणुसकीची ऊब दिली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणाला जनसेवेची दिशा दिली. सहकार क्षेत्रात “बाप माणूस” म्हणून मिळवलेला लौकिक, शिक्षण क्षेत्रात उभारलेले भक्कम कार्य आणि शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी या संस्थेच्या माध्यमातून घडवलेली ज्ञानसंस्कृती ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची अमिट ओळख ठरली. सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्न यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

परंतु नियतीच्या कठोर नियमापुढे कोणाचेच चालत नाही. विकासभाईंच्या निधनाने समाजमन सुन्न झाले; मात्र विचार कधीच मरत नसतात. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जणू काळानेच ‘विक्रांतभाई सावंत’ या युवा नेतृत्वाची निवड केली. अनुभवी दिग्गजांच्या साक्षीने आणि सर्वानुमते शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली, ती त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर असलेल्या विश्वासाची जिवंत पावतीच ठरली.
आज युवाईच्या गळ्यातील ताईत बनलेले, अभ्यासू, बाणेदार आणि जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून विक्रांतभाई सावंत यांचे नाव वेगाने पुढे येताना दिसते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शब्दातून सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
जनतेच्या विश्वासाचा विक्रमी विजय –
काळाने दिलेल्या प्रत्येक संधीचे सोनं करत विक्रांतभाई सावंत यांनी अल्पावधीतच आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. माजगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर त्यांनी मिळवलेला विक्रमी विजय हा केवळ राजकीय यश नव्हता; तो त्यांच्या लोकसंपर्क, नियोजनकौशल्य आणि जनविश्वासाचा बुलंद जाहीरनामा होता. जिल्हा परिषदेत पदार्पण होताच शिक्षण समिती सदस्यपदी झालेली निवड त्यांच्या अभ्यासू वृत्तीची आणि शैक्षणिक दृष्टीकोनाची साक्ष देणारी ठरली.

माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या रणनीतीमुळे रंजना कानसे यांना मिळालेला विजय म्हणजे सावंत घराण्याच्या राजकीय परंपरेने पुन्हा एकदा उंच भरारी घेतल्याचा क्षण! अनेक दशकांपासून जनतेच्या मनात रुजलेला विश्वासाचा झेंडा यावेळीही तेवढ्याच अभिमानाने फडकताना दिसला.
आज “विक्रांत सावंत” हे नाव केवळ राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर ते युवकांच्या आशा-आकांक्षांचे, विकासाच्या ध्येयाचे आणि विश्वासार्ह नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या त्रिवेणी संगमाने नटलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले आहे.
विकासाचा झंझावात आणि संस्कारांची मशाल –
निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्ती गाठत जनतेच्या आशीर्वादाला कृतज्ञतेने वंदन केले. रस्ते, पाणी, मंदिरांचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी विकासाचा वेग वाढवला. समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्याची त्यांची तळमळ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
शिवभक्ती तर त्यांच्या रक्तातच भिनलेली! मोबाईलच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला संस्कार, शौर्य आणि स्वाभिमानाची दिशा देण्यासाठी त्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ आणि युद्धकलेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही; तर तो भविष्यातील सशक्त आणि संस्कारित पिढी घडवण्याचा पाया आहे.
यासोबतच जिल्ह्यातून अधिकारी घडावेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे.
सर्वपक्षीय स्वीकारार्हता : नेतृत्वाची खरी ताकद –
स्वर्गीय विकासभाईंच्या सर्वसमावेशक विचारांचा वारसा पुढे नेत विक्रांत सावंत यांनी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन स्नेहसंबंधांची वीण अधिक मजबूत केली आहे. राणे परिवारापासून ते स्थानिक दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांशी त्यांनी निर्माण केलेले आत्मीय नाते त्यांच्या व्यापक स्वीकारार्हतेचे प्रतीक ठरते.






माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, धडाडीचे पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, आ. प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांसारख्या विविध पक्षांतील आणि विविध विचारांच्या मान्यवरांशी त्यांनी निर्माण केलेले मैत्रीपूर्ण संबंध हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे.

जात, पात, धर्म, पंथ आणि पक्ष यांच्या सीमारेषा ओलांडत जिंदादिल, मितभाषी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून विक्रांत सावंत आज समाजात उभे आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाकीत करण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज भासत नाही; कारण त्यांच्या कार्यातच त्यांच्या यशाचा आरसा स्पष्ट दिसतो.
ज्ञान, विनम्रता आणि माणुसकीचा सुंदर संगम –
विक्रांत सावंत यांना लाभलेला वारसा हा केवळ राजकीय नाही, तर तो वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक समृद्धीने नटलेला आहे. उच्चविद्याविभूषित असलेले विक्रांत सावंत आपल्या अभ्यासू वृत्तीने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवत आहेत.
मात्र, यशाच्या शिखरावर झेपावत असतानाही त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि विनम्रता हीच त्यांची खरी ताकद ठरते. पदापेक्षा माणुसकीला मोठे मानणारे, मित्रांसाठी कोणत्याही क्षणी धावून जाणारे आणि सर्वांना आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्त्व आज युवकांचे प्रेरणास्थान ठरत आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करतात, ही त्यांच्या सहज, मनमोकळ्या आणि प्रामाणिक स्वभावाची पावती आहे.
भविष्यातील तेजस्वी पर्व –
सावंतवाडीचे अधिष्ठान श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर, ग्रामदेवता श्री देवी सातेरी आणि भगवान महादेव यांच्या कृपाछायेने विक्रांतभाई सावंत यांच्या यशाची पताका अशीच उंचावत राहो, हीच जनतेची मनःपूर्वक प्रार्थना!
निश्चितच, सावंत परिवाराचा हा तेजस्वी कुलदीपक भविष्यात सामाजिक आणि राजकीय आकाशात गगनभरारी घेईल आणि कोकणच्या मातीतून उगवलेला हा तारा महाराष्ट्राच्या नकाशावर आपली अमिट छाप उमटवेल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.
“प्रिय विक्रांतजी,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, यश, उत्तम आरोग्य आणि नव्या संधींनी उजळून निघो. समाजसेवेचा तुमचा प्रवास असाच प्रेरणादायी राहो आणि जनतेच्या मनातील तुमच्यावरील प्रेम दिवसेंदिवस अधिक दृढ होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”
💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
✍️ प्रा. रुपेश पाटील.








