विदर्भात सूर्याचा महाप्रकोप! ; नागपुरात ४ दिवसांत १८ जणांचा गूढ मृत्यू.

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य आग ओकताना दिसत आहे. या आग ओकणाऱ्या सूर्याचे चटके आणि असह्य उकाड्याने नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. आता ही भीषण उष्णता थेट नागरिकांच्या जीवावर बेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरातील तापमानात वाढ झाल्याने शनिवारी आणखी ३ वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागपूर शहरात गेल्या ४ दिवसांतील उष्माघाताच्या संशयित मृत्यूंचा आकडा १८ वर पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात हे शनिवारी ३ मृतदेह आढळून आले. पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, डॉक्टरांच्या अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेमुळेच या नागरिकांचा बळी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लहान मुले आणि ज्येष्ठांना सर्वाधिक धोका : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

यवतमाळमध्ये नुकताच एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी वाढत्या तापमानात मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे या वाढत्या तापमानात लहान मुलांना उष्माघाताचा धोका सर्वाधिक आहे. पालकांनी विशेष काळजी घ्यावी आणि मुले दुपारी कडक उन्हात बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिल्या.

भंडाऱ्यात पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका –

उन्हाच्या या तडाख्यातून मुके प्राणी आणि पक्षीही सुटलेले नाहीत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या खुटसावरी येथे उष्माघातामुळे गेल्या महिनाभरात तब्बल ३ हजारहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पोल्ट्री व्यावसायिक रूपराम बसिने यांच्या फार्ममधील या कोंबड्या आहेत.

एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे महावितरणचा लहरीपणा यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पोल्ट्री फार्ममधील पंखे, कुलर आणि पाण्याचे फवारे बंद पडत आहेत. गेल्यावर्षी पोल्ट्री फार्ममध्ये दिवसाला १५ ते २० कोंबड्यांचा मृत्यू होत होता, मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे रोज ५० ते १०० कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत. वीज गायब झाल्यामुळे कोंबड्यांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊन त्या दगावत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles