मुंबई : पोषण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सिटू (Centre of Indian Trade Unions) संलग्न संघटनांच्या वतीने आक्रोश ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पंतप्रधान मध्यान्ह भोजन योजना (PM Mid-Day Meal) यांसह विविध योजनांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार आणि अन्य योजना कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सिटूच्या निवेदनानुसार, पोषण, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सेवा गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम योजना कर्मचारी करीत आहेत. अंगणवाडी योजनेला ५० वर्षे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २८ वर्षे तर मध्यान्ह भोजन योजनेला ३६ वर्षे पूर्ण झाली असतानाही या योजना अद्याप तात्पुरत्या स्वरूपातच राबविल्या जात असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे.
योजना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, सामाजिक सुरक्षा तसेच ईएसआयसी, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसारखे लाभ देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व क्षेत्रांतील कामगारांसाठी किमान वेतन दरमहा ३० हजार रुपये निश्चित करणे, कंत्राटी व निश्चितकालीन कर्मचाऱ्यांना कायम करणे, समान कामाला समान वेतन लागू करणे तसेच कामगारविरोधी श्रमसंहितांची अंमलबजावणी न करणे या मागण्यांचाही समावेश आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन व इतर देणी नियमित देणे, अंगणवाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करणे, लाभार्थ्यांना सकस आहार पुरविणे, निवृत्तीचे वय ६५ वर्षे करणे आदी मागण्या मांडल्या आहेत. आशा व गटप्रवर्तकांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, नियमित मानधन, पगारी रजा, बोनस आणि आवश्यक मोबाईल सुविधा देण्याची मागणी केली आहे. तर शालेय पोषण आहार कामगारांनी मानधनवाढीची अंमलबजावणी, १२ महिन्यांचे मानधन आणि इतर सुविधा देण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनाला सिटूच्या केंद्रीय नेत्या उषा रानी तसेच निवृत्त प्राध्यापक सुचिता कृष्णप्रसाद मार्गदर्शन करणार आहेत. आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, राज्य उपाध्यक्ष डॉ. विवेक मॉन्टेरो, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षा शुभा शमीम, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे तसेच महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



