वाचक मित्रहो, प्रकाशाशिवाय ज्ञान नाही, नेत्रांशिवाय जीवन नाही. असे हे दृष्टीचे जीव भारतात अनेक आहेत. पूर्ण जगात सुमारे १०० लाख लोक अंध आहेत. त्यापैकी भारतात सुमारे १७ लाख लोक आहेत. तसेच दरवर्षी २०,००० ते २५,००० लोकांची यामध्ये वाढ होत आहे. फक्त बुबुळ प्रत्यारोपण (Corneal Transplantation) करून यांपैकी अनेकांना दृष्टी परत देता येऊ शकते. यासाठी नेत्रदान जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान करणे म्हणजे नेत्रदान होय. नेत्रदान कोणीही करू शकते. नेत्रदानास वयाचे बंधन नाही.
भारतात मागील वर्षी ३८,५९६ नेत्रदान करण्यात आले होते. (Source : EBAI) त्यापैकी तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत जास्त प्रमाणात डोळ्यांचे संकलन होते. परंतु तरीसुद्धा डोळ्यांची गरज व होणारे नेत्रदान यामध्ये फारच तफावत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी स्वयंप्रेरणेने पुढे होऊन नेत्रदान करणे आवश्यक आहे.
नेत्रदानाची इच्छा असल्यास ती नोंदवून ठेवावी आणि त्याची कल्पना आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना द्यावी.
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर करावयाच्या गोष्टी
1. प्रथम तात्काळ जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा.
2. रुग्णाच्या मृत्यूची वेळ, कारण व ठिकाण याबाबत सविस्तर माहिती द्यावी.
3. मृतदेह पंख्याखाली ठेवू नये.
4. डोळे उघडे असल्यास ते बंद करावेत.
5. डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवावी.
6. घरातील पंखे व वातानुकूलित यंत्र बंद ठेवावे.
नेत्रदानाची प्रक्रिया –
नेत्रपेढी ही नेत्रदाता, डॉक्टर व नेत्ररोगतज्ज्ञ यांच्यातील दुवा असते. नेत्रदानाची माहिती मिळाल्यावर नेत्रपेढीचे कर्मचारी नेत्रदात्याच्या घरी वा हॉस्पिटलमध्ये जाऊन नेत्र व नेत्रदानाचा रक्ताचा नमुना घेतात.
मृत व्यक्तीचे डोळे मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत काढणे आवश्यक असते. माहिती मिळताच नेत्रपेढीचे कर्मचारी त्वरित मृत्यूस्थळी पोहोचतात व त्या डोळ्यांची नेत्रपेढीत नेऊन योग्य तपासणी केली जाते. त्यानंतर बुबुळास विशेष माध्यमामध्ये साठविले जाते. साठविलेले बुबुळ ४ दिवसांपर्यंत चांगले राहू शकते.
डोळे काढल्यानंतर पापण्या विशिष्ट पद्धतीने व्यवस्थित बंद केल्या जातात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रूपता येत नाही.
नेत्रपेढीत डोळे आल्यानंतर Slit Lamp व Specular Microscope या आधुनिक यंत्रांद्वारे त्यांची तपासणी केली जाते. त्यावरून बुबुळाची (Cornea) गुणवत्ता ठरविली जाते.
डोळ्याचे पारदर्शक पटल (Cornea) चांगले असल्यास त्याचे डोळ्यांत फुल पडलेल्या रुग्णात रोपण करण्यात येते. याला नेत्ररोपण असे म्हणतात.
जे डोळे नेत्ररोपणास योग्य नसतात त्यांचा संशोधनासाठी उपयोग केला जातो. चष्मा, मोतीबिंदू झालेल्या रुग्णदेखील नेत्रदान करू शकतात.
नेत्रपेढी –
सध्या भारतामध्ये सुमारे ५५० नेत्रपेढ्या आहेत, तर महाराष्ट्रात त्यांची संख्या सुमारे ५६ इतकी आहे.
आपल्या जवळच्या नेत्रपेढ्या –
सातारा
माता जिल्हा रुग्णालय आय बँक, सातारा – ४१५००१
स्मृती आय हॉस्पिटल, ४८२/३ सदर बाजार, सातारा – ४१५००१
सांगली –
वसंतरावदादा रुग्णालय आय बँक, सांगली – ४१६४१६
मिशन मेडिकल सेंटर, मिरज – ४१६४१०
कोल्हापूर
सी.पी.आर. हॉस्पिटल आय बँक, कोल्हापूर – ४१६००१
अधिक माहितीसाठी सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. संजय दळवी तसेच नेत्र चिकित्सा विभागाशी व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील (मोबाईल नंबर – 9762556121 ) यांच्याशी संपर्क साधावा.


