“कामयाब नव्हे, काबिल बना, जग तुमच्या मागे येईल!” : आ. निलेश राणे यांचा विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला. ; सकल मराठा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात.

सावंतवाडी : शिक्षण, कष्ट आणि संघर्ष यांच्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते. त्यामुळे केवळ यशस्वी होण्याचा विचार न करता स्वतःला इतके सक्षम आणि कर्तृत्ववान बनवा की जग तुमच्या मागे येईल. आपल्या कार्याची अशी छाप उमटवा की ती कोणालाही पुसता येणार नाही, असे प्रेरणादायी आवाहन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांना केले.

सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी-बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आ. निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील संघर्ष, जिद्द आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ते म्हणाले, “आज आम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहोत, ते सहजासहजी मिळालेले नाही. आयुष्यात अनेक चढ-उतार, अपयश आणि संघर्षांचा सामना केल्यानंतरच यश मिळते. त्यामुळे कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही. आज या व्यासपीठावरील प्रत्येक मान्यवर संघर्षाच्या बळावरच या स्थानापर्यंत पोहोचला आहे.”

यावेळी त्यांनी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य दिशा देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले, माझ्या पडत्या काळात ज्या काही मोजक्या लोकांनी मला प्रोत्साहन दिले आणि आधार दिला, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सीताराम गावडे. आपल्या समाजातील गुणवंत मुला-मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उदात्त उद्देशाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे या कौतुक सोहळ्याचे सातत्याने आयोजन करत आहेत. १० वी आणि १२ वी नंतर पुढे नेमकं काय करायचं, याचे योग्य मार्गदर्शन या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मिळते, असे ते म्हणाले.
​​
राणे साहेबांमुळेच जिल्ह्यात उच्च शिक्षणाची गंगा: आ. दीपक केसरकर
​यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी ज्या मेडिकल कॉलेजची स्थापना केली, तिथून पहिली डॉक्टरांची बॅच यशस्वीपणे बाहेर पडली, हा मोठा अभिमान आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करून स्थानिक मुलांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. आज त्यांचे दोन्ही सुपुत्र (आ. निलेश राणे आणि आ. नितेश राणे) जिल्ह्याच्या विकासासाठी उत्तम काम करत आहेत.” मराठा समाजाने आपल्या राजकीय प्रवासात नेहमीच खंबीर साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

युती सरकारकडून मराठा समाजाला सर्व सवलती: संजू परब.
​शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब आपल्या मनोगतात म्हणाले की, सह्याद्रीच्या पट्ट्यातील गोरगरीब आणि गुणवंत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आ. निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर हे नेहमीच अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून प्रोत्साहन देतात. तसेच राज्यातील युती सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सर्व सवलती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठा समाज संघटनेची वाटचाल विषद केली.
​या भव्य सोहळ्याला व्यासपीठावर आ. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक संजू परब, वेंगुर्ले सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जय भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles