वटपौर्णिमेतून निसर्गपूजा, संस्कृती अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश. ; हळदोणा येथे श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने भक्तिभावात उत्सव, गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षाचे औचित्य.

हळदोणा (गोवा) : परमपूजनीय सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहणाच्या रजतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री दत्त पद्मनाभ पीठ, जगत जननी तथा संत समाज हळदोणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रवळघाडी पंचायतन देवस्थान, जयदेव वाडा येथे वटपौर्णिमा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

निसर्गपूजेची परंपरा जपणाऱ्या या उत्सवात उपस्थित सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने सावित्री आख्यानाचे सामूहिक पठण केले. त्यानंतर वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली. एकमेकींना वाण देण्याची परंपरा जपत भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्यही अधोरेखित करण्यात आले.

उत्सवात सौभाग्यवती सुजया सविदास नाईक, वर्षा नार्वेकर, रेषा वायंगणकर, रेशमा नाईक, वंदना नाईक, नितिषा नाईक, उषा कोरगावकर, अमिता साळगावकर यांच्यासह हळदोणा गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

या प्रसंगी वटवृक्षाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, भारतीय संस्कृतीचे जतन आणि कौटुंबिक मूल्यांचे संवर्धन यांचा संदेश देण्यात आला. वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, जगत जननी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संत समाज हळदोणा यांच्या आयोजनातून संपन्न झालेला हा वटपौर्णिमा उत्सव श्रद्धा, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles