✍️ रूपेश पाटील.
‘रोखठोक, बिनधास्त, बेधडक अन् दिलखुलास’ या चार शब्दांना जणू मूर्त रूप लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब! लोकांच्या प्रश्नांची जाण, सामान्यांच्या वेदनेची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची तळमळ या गुणांच्या बळावर या झुंजार नेतृत्वाने सावंतवाडीच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर स्वतःची वेगळी, दमदार आणि ठसठशीत ओळख निर्माण केली.
तरुणाईची ऊर्जा, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ, निर्णयक्षमतेची धार आणि राजकारणातील आक्रमक फायरब्रॅण्ड अंदाज ही संजू परब यांच्या नेतृत्वाची खास वैशिष्ट्ये. शाखाप्रमुखापासून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व तालुकाध्यक्ष, स्वाभिमानचे नेतृत्व, सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि आता शिवसेना जिल्हाप्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे संघर्ष, कर्तृत्व आणि सातत्याने उभारलेल्या नेतृत्वाची प्रेरणादायी गाथाच म्हणावी लागेल.

मडुराच्या मातीतून सावंतवाडीच्या राजकीय क्षितिजावर!
मडुरासारख्या ग्रामीण मातीतून आलेल्या संजू परब यांचे शालेय आणि पदवी शिक्षण सावंतवाडीत झाले. कॉलेज जीवनापासूनच त्यांच्या नेतृत्वगुणांची चमक जाणवू लागली. १९९९ मध्ये शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ धरला. २००८ मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, तर २००९ मध्ये तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयासाठी त्यांनी झोकून देत काम केले. या कार्यातून निलेश राणे यांच्या विश्वासातील सहकारी म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले.
२०१० ते २०१३ या काळात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, त्यानंतर जिल्हा सरचिटणीस आणि २०१४ मध्ये तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी सावंतवाडी तालुका अक्षरशः पिंजून काढला. गावोगावी कार्यकर्त्यांची मोट बांधली, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलने केली आणि प्रसंगी स्वतःवर केसेसही घेतल्या; कारण त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे माध्यम!
विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घडवला राजकीय ‘करिष्मा’!


सावंतवाडी शहरात आमदार दीपक केसरकर यांचे वर्चस्व असताना नगरपरिषदेच्या राजकारणात १७-० असे चित्र होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत संजू परब यांनी ८ नगरसेवक निवडून आणत विरोधकांच्या बालेकिल्ल्याला पहिला मोठा धक्का दिला.

यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही त्यांच्या संघटनकौशल्याची ताकद दिसून आली. जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ५, तर पंचायत समितीच्या १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही तब्बल ८० टक्के ग्रामपंचायती आपल्या बाजूने आणण्यात त्यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा राहिला.
राणे कुटुंबीयांनी ‘स्वाभिमान’ची वाट धरल्यानंतरही संजू परब यांनी त्यांच्याशी असलेली निष्ठा कायम ठेवली. त्यांच्या वाढदिवसाला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर हे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह उपस्थित राहिल्याने सिंधुदुर्गाच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली; मात्र आमिषांपेक्षा निष्ठेला आणि पदापेक्षा विचारांना महत्त्व देणारा हा नेता आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.

२०१९ : राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदलेले वर्ष!
२०१९ मध्ये राणे कुटुंबीय भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर संजू परब यांनी तालुका भाजपमय करण्याचा निर्धार केला. पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. बांदा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अक्रम खान यांच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आणि मग आली सावंतवाडी नगराध्यक्षपदाची ऐतिहासिक निवडणूक!
माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या पाठिंब्याने लढलेल्या या लढाईत संजू परब यांनी केवळ विजय मिळवला नाही, तर सावंतवाडीच्या राजकीय इतिहासालाच नवे वळण दिले.
२९ डिसेंबर २०१९ रोजी तब्बल २५ वर्षांनंतर सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आणि प्रथम नागरिक म्हणून संजू जगन्नाथ परब यांच्या नावावर जनतेने शिक्कामोर्तब केले.
१ जानेवारी २०२० रोजी त्यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
फक्त ७२० दिवस… पण विकासाचा झंझावात अविरत!
नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ त्यांच्या वाट्याला केवळ ७२० दिवसांचा आला. त्यातला मोठा काळ कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात गेला. निधीला ब्रेक, प्रशासनासमोर आव्हाने आणि शहरासमोर आरोग्याचे संकट असतानाही संजू परब यांची विकासाची गती थांबली नाही.
‘शहराचा विकास हाच ध्यास’ या भूमिकेतून त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. प्रशासकीय अनुभव नसतानाही त्यांनी प्रशासन केवळ चालवले नाही, तर ‘पळवून’ दाखवले!
नागरिकांच्या तक्रारींसाठी पालिकेची दालने खुली केली, अधिकारी-कर्मचाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आणि प्रत्येक विभागाचा बारकाईने आढावा घेतला. त्यांच्या निर्णयक्षमतेचा आणि इच्छाशक्तीचा प्रत्यय सावंतवाडीकरांना आला.
कोरोनाच्या काळात ‘नगराध्यक्ष’ नव्हे, तर जनतेचा योद्धा!
कोरोना महामारीने जगाला हादरवून सोडले असताना संजू परब स्वतः कोरोनाबाधित झाले. मात्र संकटाने त्यांची पावले रोखली नाहीत. उलट अधिक जोमाने ते मैदानात उतरले.
शहर आणि तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन स्वखर्चातून १७० ‘कोरो बेड’ खरेदी करून आरोग्य व्यवस्थेला हातभार लावणारे ते पहिले नगराध्यक्ष ठरले. नगरपालिकेत क्वारंटाइन हेल्प सेंटर सुरू केले.
स्वतः संकटात असूनही जनतेसाठी उभे राहणे — हाच त्यांच्या नेतृत्वाचा खरा चेहरा!
विकासकामांचा धडाका — आकडेच सांगतात कर्तृत्वाची कहाणी!
नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकिर्दीत तब्बल ५१ विकासकामे पूर्णत्वास आली, तर ६६ कामे प्रत्यक्ष सुरू झाली. या कामांसाठी तब्बल १३ कोटी २१ लाख ३९ हजार ५४७ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
त्यांच्या कार्यकाळातील ठळक कामांमध्ये —
– काझी शहाबुद्दीन हॉलचे नूतनीकरण
– घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
– मंडईचे नूतनीकरण व विकास
– जलतरण तलावाचे लोकार्पण
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन
– क्रीडाक्षेत्रातील विविध विकासकामे
– ‘I LOVE सावंतवाडी’ सेल्फी पॉईंट
– बॅ. नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण
– कॉनव्हेक्स मिरर व बांबू लागवड
– कोरोना काळातील आरोग्यविषयक पुढाकार
– भोसले शिवउद्यान कुंपण भिंतीचे बांधकाम
– रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न
– माझी वसुंधरा अभियान
– नळपाणी योजनेस मंजुरी
– माजी सैनिकांसाठी हक्काची जागा
याच काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानात सावंतवाडी नगरपरिषद जिल्ह्यात प्रथम आणि महाराष्ट्रात १७ व्या क्रमांकावर आली.
गावाशी नाळ, कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि जनतेशी ऋणानुबंध!
शहराच्या राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचूनही संजू परब यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. गावदौरे करत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला आपलंसं करणारा, संकटात धावून जाणारा आणि अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक भक्कम होत गेली.
‘कितीही विरोध झाला तरी चालेल; जे योग्य आहे ते मी करणारच!’ ही त्यांची भूमिका आजही त्यांच्या नेतृत्वाची ओळख आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची धुरा — विरोधकांना घाम फोडणारे नेतृत्व!
२०२५ मध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संजू परब यांनी या जबाबदारीलाही आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत न्याय दिला. संघटन मजबूत करताना विरोधकांना थेट अंगावर घेण्याचा त्यांचा फायरब्रॅण्ड अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबीयांची खंबीर साथ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ या तीन आधारस्तंभांवर त्यांचा प्रवास आजही सुरू आहे. वडिलांनंतर सावंतवाडी-दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्षपद ते समर्थपणे सांभाळत आहेत.
राजकीय प्रवास : संघर्षातून नेतृत्वाच्या शिखराकडे!
१९९९ — शिवसेना शाखाप्रमुख
२००८ — राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष
२००९ — राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष
२०१०–२०१३ — राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
२०१४ — काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व तालुकाध्यक्ष
२९ डिसेंबर २०१९ — सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून विजयी
१ जानेवारी २०२० — नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
२०१९ — भाजप जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती
२०२५ — शिवसेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.
आगामी वाटचाल — सावंतवाडीच्या राजकारणातील नवे क्षितिज!
आगामी नगरपरिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याचा संजू परब यांचा निर्धार आहे. नगराध्यक्षपद पुन्हा एकदा शिवसेनेकडे आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
विकासाची दृष्टी, धडाकेबाज कामाची शैली, निर्णयक्षमता, संघटनकौशल्य आणि राजकीय मुत्सद्देगिरी यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भावी नेतृत्वासाठी संजू परब यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे. आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची इच्छा आणि कार्यकर्त्यांच्या मनातील ‘आपला संजू आमदार व्हावा’ हे स्वप्न त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला नवी दिशा देणारे ठरू शकते.
झेप आकाशापलीकडची असो… कर्तृत्वाची उंची काळालाही थक्क करणारी असो!
”झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा;
ज्ञान इतके मिळवा की सागरालाही अचंबा वाटावा,
इतकी प्रगती करा की काळालाही क्षणभर थांबून पाहावे!”
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदत, यशाचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरवत आपली वाटचाल अशीच अविरत सुरू राहो. प्रत्येक वाढदिवसागणिक आपल्या यशाचे आभाळ अधिकाधिक विस्तारत जावो; समृद्धीच्या सागराला किनारा लाभू नये आणि आनंदाची फुले आयुष्यभर अशीच बहरत राहावीत.
आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, निरामय आरोग्य, ऐश्वर्य आणि यशाने परिपूर्ण होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
रोखठोक नेतृत्वाला, दिलदार व्यक्तिमत्त्वाला आणि झुंजार जननेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक, हृदयस्पर्शी शुभेच्छा!
स्नेह कायम राहो… कर्तृत्वाची भरारी निरंतर वाढत राहो… आणि जनसेवेच्या वाटेवरील आपला प्रवास यशाच्या नव्या शिखरांकडे सदैव झेपावत राहो!
शब्दांकन – प्रा. रुपेश पाटील



