सावंतवाडी : “अपप्रवृत्तीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनताच बिमोड करणार.!”, असं आता दीपक केसरकर म्हणत आहेत. पण ह्या अपप्रवृत्ती नेमक्या कोणत्या? कुठल्या?
गेली दहा बारा वर्षे हेच मिस्टर दीपक केसरकर खासदार नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपप्रवृत्ती म्हणत होते. मग आता ते सत्प्रवृत्त झाले आहेत का?, आणि आताच्या बदललेल्या नव्या अपप्रवृत्ती कोणत्या?
मतदारसंघातील जनता तर ऐनवेळी खोके मिळाले आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळालं म्हणून सुरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास करणाऱ्यांना ‘अपप्रवृत्ती’ म्हणत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत आमदारकी आणि मंत्रीपदं उपभोगत स्वतःचा भरभक्कम आर्थिक विकास करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना जनता ‘अपप्रवृत्ती’ म्हणत आहे.
गोवा – बांबोळीच्या वाटेवर आपला जीव सोडणारे दुर्दैवी आत्मे कोणाला ‘अपप्रवृत्ती’ म्हणत आहेत?, गळकी छप्परं आणि शिक्षकांची रिक्त पदे असणाऱ्या जिप शाळेतील लहान लहान मुलं आणि त्यांचे गरीब पालक आज कोणाला ‘अपप्रवृत्ती’ म्हणत आहेत?, बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेली युवापिढी ड्रग्स मुळे आपलं बहुमुल्य जीवन संपवत आहे, त्यांचे पालक आज कोणाला म्हणत आहेत “अपप्रवृत्ती”?, नक्की सत्प्रवृत्ती कुठल्या आणि अपप्रवृत्ती कोणत्या?, असा रोखठोक सवाल उबाठा सेनेचे प्रवक्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केलाय.