एकजुटीचा वज्रप्रहार! – ऑन ड्युटी TTE च्या सन्मानावर घात! ; रत्नागिरीत NRMU आक्रमक, प्रत्युत्तरादाखल जोडायला लावले हात!

रत्नागिरी : रेल्वे सेवेत कर्तव्य बजावताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते; पण काही प्रसंग असे असतात, जे केवळ एका घटनेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कर्मचारीवर्गाच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा ठसा उमटवून जातात.

आज नेत्रावती एक्सप्रेस (डाऊन) 16345 DN या गाडीत घडलेली एक घटना अशीच ठरली, जी रेल्वे कर्मचारीवर्गाच्या एकजुटीचे आणि स्वाभिमानाचे ठळक उदाहरण बनली.”

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या समर्थनापुरती मर्यादित राहिली नाही; उलट ती रेल्वे कर्मचारीवर्गातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनली. रेल्वे सेवेत काम करणारे कर्मचारी अनेक अडचणी, ताणतणाव आणि आव्हानांचा सामना करत असले तरी सहकाऱ्याच्या सन्मानासाठी ते एकदिलाने उभे राहतात, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले.

अनेकदा पडद्यामागे राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांची एकजूट आणि कर्तव्यनिष्ठा हीच रेल्वे व्यवस्थेची खरी ताकद असल्याचे या प्रसंगाने दाखवून दिले.

नेमका काय आहे प्रकार?

नेत्रावती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पॅन्ट्री कारमध्ये गेलेल्या ऑन ड्युटी TTE सोबत पॅन्ट्री मॅनेजरने केलेल्या गैरवर्तनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पॅन्ट्री कारबाबत तक्रार केली होती. ती तक्रार संबंधितांकडे पोहोचवण्यासाठी ऑन ड्युटी TTE पॅन्ट्री कारमध्ये गेले. मात्र, तक्रार ऐकून घेण्याऐवजी पॅन्ट्री मॅनेजरने TTE यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
वाद एवढा विकोपाला गेला की, त्या मॅनेजरने ऑन ड्युटी TTE ची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याची घटना घडली.

ही माहिती मिळताच रत्नागिरी स्टेशनवरील चेकिंग स्टाफ तात्काळ एकत्र आला. यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सहाय्यक महामंत्री कॉ. कुमार घोसाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कॉ. मंगेश शिर्के यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) यांच्या मदतीने संबंधित पॅन्ट्री मॅनेजरला गाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सर्वांसमोर त्या मॅनेजरकडून ऑन ड्युटी TTE यांची हात जोडून माफी मागण्यासाठी भाग पाडण्यात आले.

रेल्वे सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांशी अशा प्रकारचे गैरवर्तन होणे ही गंभीर बाब मानली जाते. कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्याचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना या घटनेनंतर NRMU चे सहाय्यक महामंत्री कॉ कुमार घोसाळकर यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी रत्नागिरी चेकिंग स्टाफची एकजूट आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनची तत्पर भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली.

सहकाऱ्याच्या सन्मानासाठी सर्वांनी दाखवलेली एकजूट ही खऱ्या अर्थाने कर्मचारीवर्गातील बांधिलकी आणि सहकार्याची भावना अधोरेखित करणारी ठरली.

या प्रसंगी आपल्या हातातील कामाची पर्वा न करता तात्काळ एकत्र येत एकजूट दाखवल्याबद्दल, चेकिंग स्टाफची धुरा समर्थपणे सांभाळणारे कॉ. मंगेश साळवी यांनी सर्व सहकारी तसेच NRMU च्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशा प्रसंगी दाखवलेली एकजूट हीच कर्मचारीवर्गाची खरी ताकद असून, परस्पर सहकार्य आणि एकदिलाने उभे राहण्याची ही भावना भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या घटनेनंतर रेल्वे कर्मचारीवर्गात एकच भावना व्यक्त होत होती….
कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सन्मानावर कुणीही हात घालण्याचा प्रयत्न केला, तर कर्मचारी एकजुटीने त्याला ठाम उत्तर दिले जाईल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles