सावंतवाडी : सावंतवाडी येथे भाजपा संपर्क कार्यालयात “भाजपा ध्वज वाटप अभियान”चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्वज वाटप करण्यात आले.
६ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणारा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह आणि अभिमानाने साजरा केला जाणार आहे. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाचा वर्धापन दिन राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्या हजारो घरांवर, तसेच मंडळ, बूथ आणि शक्तिकेंद्र कार्यालयांवर भाजपाचे ध्वज फडकवले जाणार आहेत.
स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या ध्वज वाटप कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी विशाल परब यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.
“उद्या सावंतवाडी मतदारसंघातील हजारो घरांवर भाजपाचे ध्वज फडकतील आणि संपूर्ण परिसर भाजपामय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे स्थापना दिनाच्या उत्साहाला अधिकच उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



