सावंतवाडी : “कार्य सन्मान… राष्ट्राचा अभिमान!” हे प्रेरणादायी ब्रीद हृदयाशी बाळगत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे समाजहिताचे कार्य अविरतपणे करत आहे. कष्ट, समर्पण, जिद्द आणि समाजसेवेच्या तेजस्वी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत श्री कार्य गौरव सोहळा’ या भव्य कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवाभावाने कार्य करणाऱ्या सौ. मानसी परब – राणे यांना “महाराष्ट्र नारिशक्ती गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील पत्रकार भवन, गांजवे चौक, नवीन पेठ येथे रविवारी १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हा दिमाखदार सोहळा पार पडला. समाजासाठी झटणाऱ्या असंख्य व्यक्तींमध्ये मानसी परब – राणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
गेली अनेक वर्षे कष्टकरी, श्रमिक आणि कामगार बांधवांच्या न्यायहक्कासाठी खंबीरपणे लढणाऱ्या मानसी परब – राणे यांनी आपल्या कार्यातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकटात सापडलेल्या कामगारांच्या मदतीला धावून जाणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आणि श्रमजीवींच्या डोळ्यात आशेचा दिवा पेटवणारी ही ‘मानसीय राणी’ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

त्यांच्या कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि निस्वार्थ समर्पणाचा गौरव करत हा पुरस्कार अभिनेते, निर्माता आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेते नितीन घारे तसेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना मानसी परब – राणे भावूक होत म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या कष्टकरी, श्रमजीवी आणि कामगार बांधवांचा आहे. त्यांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच मला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. समाजसेवेचे हे व्रत असेच अखंड सुरू राहील.”
त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. समाजासाठी झटणाऱ्या एका संवेदनशील स्त्रीच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मानसी परब – राणे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामाजिक क्षेत्रातील मान आणखी उंचावला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “समाजासाठी जगणारी माणसं हीच खरी समाजाची संपत्ती असते,” याची जिवंत प्रचिती त्यांच्या कार्यातून पुन्हा एकदा सर्वांना आली आहे.



