Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवरायांचा पुतळा राजकोट येथे उभारणार.! : पालकमंत्री नितेश राणे. ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ’ संपन्न.

राजकोट :- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असणार आणि जगभरातून लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा ‘पायाभरणी समारंभ’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी आमदार दीपक केसरकर , आमदार निलेश राणे, आमदार कालीदास कोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आदी उपस्थित होते. यावेळी कोनशीलेचे अनावरण करण्यात आले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनविण्यात येणार आहे तो कसा बनतोय, कोण बनवतोय याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडावी असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. महाराष्ट्रातील जनतेचीच नाही तर संपुर्ण जगातील लोकांची नजर या कार्यक्रमाकडे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांची किर्ती संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. म्हणून आज जो कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, आमच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणं याबद्दल आम्ही सर्वजण स्वत:ला नशिबवान समजतो असेही ते म्हणाले. पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रक्रीयेच्या पहिल्या दिवसापासून ते हा पुतळा कसा बनावा, त्याची डिझाईन कशी असावी, पुतळा कोणी बनवला पाहिजे, त्याची तांत्रिक बाबी काय असल्या पाहिजेत याबाबत अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. यासाठी अनेक बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या आहेत. पालकमंत्री म्हणून मी या कार्यक्रमास उपस्थित असलो तरी हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेत्वृत्वाखालीच होत आहे. आज आम्ही येथे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित आहोत. दोन आठवड्यापुर्वी राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुतळा उभारणीबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. याबाबतची सविस्तर सादरीकरणही ते लवकरच घेणार आहेत. अतिशय बारकाईने पुतळ्याच्या उभारणीवर राज्य शासनामार्फत लक्ष देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या विश्वास देतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा असा उभा करण्यात येईल की, त्याचा संपुर्ण जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून अनेक लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील असेही ते म्हणाले.
पुतळ्याविषयी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, हा पुतळा जगविख्यात जेष्ठ मुर्तीकार राम सुतार बनविणार आहेत. त्यांच्या कामाबद्दल फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगभरामध्ये कौतुक आहे. गुजरात मध्ये असणारा सरदार वल्लभ भाई पटेलांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा भव्य पुतळा देखील राम सुतार यांनी बनविलेला आहे. शिवाय दादर येथील इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक उभं राहणार आहे ते देखील राम सुतारच उभारणार आहेत. अशा या महान व्यक्तीकडून आपण हा पुतळा उभारणार आहोत. या पुतळा उभारणीमध्ये महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे. आमदार निलेश राणे यांनी किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत , तटबंदीबाबत तसेच या भागाच्या विकासासाठी काही सूचना केलेल्या आहेत. मी त्यांना विश्वास देतो की, त्यांनी केलेल्या सुचनांची पुर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राजकोट परिसरातील सुरक्षितता, सुशोभिकरण या सर्व गोष्टीवर फार बारकाईने लक्ष देणे महत्वाचे आहे. आमदार दिपक केसरकर यांच्या सूचनेनूसार पुतळ्याचा बाजूला ‘शिवसृष्टी’ उभा केली तर पुतळा पाहण्यासाठी जे शिवप्रेमी येथे येतील त्यांना शिवरायांचा इतिहास व शिवरायांबद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होईल. या परिसरामध्ये ते जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील या दृष्टीकोनातून ‘शिवसृष्टी’ हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेत आहे. संबंधित जमीन मालकांसोबतही चर्चा सुरु आहे. पुतळा उभारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर लगेच ‘शिवसृष्टी’ उभा करण्याचे कामही सुरु होईल असा विश्वासू मी देतो असेही ते म्हणाले.

आमदार दिपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोह‍चविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक उपक्रम राबवित आहे. नाविक दलाची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दखल घेऊन नौदलाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जिल्ह्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीला देखील कळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराजांचा पुतळा उभारताना परिसरातील सुरक्षेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. या परिसरात पेालिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केले. ते म्हणाले या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. या पुतळा उभारण्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमित केलेले आहेत. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर सुरू असून आजमितीस पुतळ्याचे १० फूट उंचीचे आरसीसी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात येत असल्याचेही श्री. किणी यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles